वैरागड : मृग नक्षत्राचा प्रारंभ दमदार पावसाने झाला आणि त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने खरीप हंगाम पूर्व बाह्य मशागतीची कामे शेतकरी झपाट्याने आटाेपत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी धान रोवणीपेक्षा आवत्या पद्धतीला अधिक पसंती देत आहे.
धान रोवणीपेक्षा या वर्षात शेतकरी आवत्या पद्धतीला अधिक पसंती देत आहे. धान रोवणीला उत्पादन थोडे फार जास्त होत असले तरी उत्पादन खर्च मात्र अधिक आहे. त्यातही मजुरांची अडचण भासत असते. रोवणीसाठी पऱ्हे टाकणे, चिखलणी करणे, रोवणी करणे यांसाठी शेतकऱ्याला एकरी अंदाजे १० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन खर्च भरून निघणे कठीण असते. अशा स्थितीत आवत्या पद्धतीत एकदा रोवणी करून धान बीज टाकले की, मजुरांकरवी निंदण किंवा तणनाशकाची फवारणी केल्यास चांगले उत्पादन होऊ शकते. उत्पादनखर्च कमी येतो; त्यामुळे शेतकरी आवडत्या पीकपद्धतीला अधिक पसंती देत आहे.
मृगनक्षत्राची सुरुवात ९ जूनला झाली. त्याबरोबर वरुणराजाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतीच्या बाह्य मशागतीच्या कामाला शेतकऱ्याला फार प्रतीक्षा करावी लागली नाही. शेतकऱ्यांनी वेगाने नांगरणी आटोपून खरीप हंगामापूर्वी पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरीप हंगाम पेरणी वेळेवर होत असून थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यास धान रोवणी वेळेवर होईल. या वर्षात चांगल्या पर्जन्यवृष्टीचा अंदाज असल्याने शेतकरी सध्या तरी चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगून आहे.
===Photopath===
150621\img_20200609_094327.jpg
===Caption===
परे टाकण्यासाठी वखरणी करताना शेतकरी