लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील तुर्रेमर्का गावातील महिलेला प्रसुतीसाठी २३ किलोमीटर चालत यावे येऊन पाच दिवसाच्या बाळासह चालतच गावी लागल्याची घटना राज्यभर चर्चेचा विषय झाली. त्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच दुसऱ्या एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जया रवी पोदाडी (२३) असे त्या महिलेचे नाव असून ती गुंडेनूर येथील रहिवासी आहे.चार महिन्यांची गर्भवती असलेल्या जया पोदाडी ही महिला बुधवारी (दि.८) शेतात काम करून सायंकाळी घरी परतल्यावर अचानक तिला चक्कर आली. त्यामुळे तिला खाटेवर टाकून गुंडेनूर नाल्याच्या कमरेभर पाण्यातून वाट काढून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले. लाहेरीवरून रूग्णवाहिकेने तिला भामरागडला आणले असता ग्रामीण रूग्णालयाच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जया ही चार महिन्यांची गरोदर असून तिला याआधीचे चार वर्षांचे बाळ आहे. तिच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.रस्ते आणि पुलांअभावी गावापर्यंत वाहन जात नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी जयाप्रमाणे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो.पावसाळ्याच्या सुरूवातीलाच भामरागड तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहात असल्याने त्यातून वाट काढत पैलतीरावर जाणे धोकादायक ठरत आहे.लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून जया रवी पोदाडी या महिलेला रुग्णवाहिकेने भामरागडला आणले त्यावेळी ती मृत असल्याचे दिसून आले. आज तिचे शवविच्छेदन केले. आमच्या प्राथमिक अंदाजानुसार गर्भाशयाचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. मलेरियाही नव्हता. हिमोग्लोबिन ८.४ होते. साप चावल्याचेही लक्षण नव्हते. केवळ हृदयात रक्त साठवल्याचे आढळले, त्यामुळे व्हॉल्वचा प्रॉब्लेम असावा असा अंदाज आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.- डॉ.भावेश वानखेडेप्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय भामरागड
वेळेवर उपचाराअभावी गडचिरोलीच्या दुर्गम भागातील गर्भवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 6:04 PM
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
ठळक मुद्देखाटेवर टाकून आणलेचार महिन्यांची होती गरोदर