गडचिरोली / भामरागड : पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवती महिलेला पैलतीरी जाण्याची वेळ आली. शुक्रवारी सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावर हा प्रकार घडला. त्यामुळे गावातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही बिकट असल्याचे दिसून येते.
झुरी संदीप मडावी (२२) असे महिलेचे नाव आहे. शुक्रवारी प्रसववेदना सुरू झाल्याने समुदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात नेत होत्या. वाटेतील नाल्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे जेसीबीचा आधार घेतला.
दुर्गम, अतिदुर्गम भागातील गर्भवतीसाठी ट्रॅकिंग सीस्टिम आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. महिलेस प्रसववेदना सुरू झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयात नेले. तिची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी
पवन बोपटे
आपातापा (जि. अकोला) : येथील एक गर्भवती महिला मंगळवारी रुग्णालयात जाण्यासाठी निघाली; मात्र चिखलात पाय घसरून पडल्याने काही महिलांनी साडीच्या झोळीतून तिला मुख्य रस्त्यापर्यंत नेले. तेथून तिला रुग्णालयात नेण्यात आले.
...अन् बाळ दगावले
शीतल कासदे असे या महिलेचे नाव असून अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी तिची प्रसूती झाली. मात्र मृत बाळ जन्माला आले. महिलेच्या तपासणीत हिमोग्लोबिन ४ पेक्षाही कमी, पांढऱ्या पेशीच नसल्याचेही दिसले. त्यामुळे बाळाचा मृत्यू कोसळल्याने झाला असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.