लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: सिरोंचापासून अवघ्या २६ कि.मी. अंतरावर टेकडाताला हे गाव आहे. तेथील एका गरोदर महिलेला शुक्रवारी सकाळी दवाखान्यात नेण्यात आले. तिची तपासणी केली असता, तिचे हिमोग्लोबिन कमी असल्याने तेथील डॉ.सचिन मडावी यांनी तिला अहेरीच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
दोन जिवांची व दिवस भरलेली ती महिला, (सरिता पेंटा तालंडी वय 29, गाव कंबालपेटा,) कशीबशी अहेरीसाठी निघाली. वाटेत कंबलपेठा या गावाजवळच्या नाल्यावरचा पूल तुटलेला दिसला. तो पार करणे शक्य नसल्याने ती महिला प्रसववेदना सहन करतच नाला चालत पार करून दवाखान्यात पोहचली. तिला नाला पार करण्यासाठी डॉ. मडावी व अन्य कर्मचारी यांनी मदत केली.वस्तुत: गरोदर स्त्रीला रुग्णालयात जाण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची सोय करून देण्यात येते. मात्र रस्ते व पूलच खराब असल्यामुळे रुग्णांना चालत जाऊनच दवाखाना गाठावा लागतो आहे.