पीएचसीत सुविधा : सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार, सर्पदंश व इतर आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. यासंदर्भात १२ ही तालुकास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका नुकत्याच घेतल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण, उपजिल्हा व गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंशावरील ‘विषरोधक’ इंजेक्शन उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम भागात असून ती जंगलालगत आहेत. शिवाय शेतशिवार परिसरातही साप आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना विविध भागात मोठ्या प्रमाणावर घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर लागलीच उपचार होणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित इसम दगावतो. त्यामुळे आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वीच सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयात सर्पदंशावरील विषरोधक इंजेक्शन उपलब्ध केली आहे. उपकेंद्रात शीतगृहाची व्यवस्था नसल्याने येथे सर्पदंशावरील वीज उपलब्ध नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी सांगितले.
आजार नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
By admin | Published: June 17, 2017 2:01 AM