जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. मात्र, पाऊस जाताच कडक ऊन निघत असल्याने जमिनीतील ओलावा लवकरच नष्ट हाेत हाेता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली नाहीत. माेठा पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकरी करीत हाेते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशाच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली हाेती. बुधवारी दिवसभर कडक ऊन हाेते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. काही भागात सकाळी, तर काही भागात दुपारी पावसाने हजेरी लावली. काही भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे.
बाॅक्स
अगदी वेळेवर आला पाऊस
यावर्षी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुरू हाेणार आहेत. काही पावसाळ्यात पाऊस १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करायला लावतो. त्या तुलनेत यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस केवळ अधिक पडून फायदा नाही, तर पावसात सातत्य असणे आवश्यक आहे.
कापसाच्या टिबणीला सुरुवात
- चामाेर्शी, सिराेंचा या तालुक्यातील शेतकरी कापूस शेतीकडे वळत चालला आहे. या भागात दरवर्षी कापसाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपासूनच कापूस टिबणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
-ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा धान उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला सुरुवात केली आहे.