कुरखेडा : आजच्या वैश्विकीकरणाच्या युगात मायबोली मराठी भाषेचे जतन व संवर्धन करीत तिला गतवैभव मिळवून देणे ही काळाची गरज आहे. याकरिता प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषेचा आग्रह करीत त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी जि. प. सदस्य योगराज पाटील कुथे यानी केले.
कुथे पाटील विद्यालय गोठणगाव येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मायबोली मराठी आणि मराठी माणूस’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वैश्विकीकरणाच्या या युगात इंग्रजी व हिंदी या भाषेच्या अतिवापरामुळे मराठी भाषेचे अस्तित्व हरवत चालले आहे. काळाच्या ओघात गडप होत असलेल्या संस्कृत भाषेच्या अस्तित्वावर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाप्रमाणे मराठी भाषेची अवस्था होऊ नये, याकरिता मराठी माणसाने आग्रहाने प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषेचा आग्रह धरावा असे सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. जे. बगमारे, उराडी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत भुरले, शिक्षक प्रकाश मिसार, योगानंद कराडे व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.