गडचिराेली : गुळाचे औषधीयुक्त महत्त्व नागरिकांना कळायला लागल्याने साखरेऐवजी गुळाचा वापर वाढला आहे. त्यामुळे गुळाची किंमतसुद्धा साखरेच्या जवळपास दुप्पट आहे. सद्य:स्थितीत साखर ३८ रुपये किलाे, तर गूळ ७० रुपये किलाे दराने विकला जात आहे.
पूर्वीच्या काळात गाेड पदार्थ तयार करण्यासाठी गुळाचा वापर केला जात हाेता. मात्र, कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन व्हायला सुरुवात झाल्यानंतर साखरेची मागणी वाढली. ग्रामीण भागापर्यंत गुळाला पर्याय म्हणून साखरेचा वापर सुरू झाल्याने आपाेआपच गुळाची मागणी कमी झाली व उत्पादनही कमी झाले. साखर तयार करण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखर शरीरासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काेराेनाच्या काळात बहुतांश नागरिकांना आराेग्याची काळजी वाटायला लागली. या नागरिकांनी साखरेऐवजी गुळाचा वापर सुरू केला, तर काही नागरिक पूर्वीपासूनच गुळाचा नियमित वापर करतात. त्यामुळे गुळाची मागणी वाढली आहे.
बाॅक्स...
काेराेना काळात वाढली गुळाची मागणी
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा जीव घेतला. ज्या नागरिकांची राेगप्रतिकार शक्ती चांगली हाेती, अशांनी काेराेनावर मात केली. त्यामुळे नागरिक राेगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत हाेते. गूळ हा आराेग्यासाठी अतिशय लाभदायक मानला जाते. काेराेना साथीच्या पूर्वी जे कुटुंब संक्रांतीच्या कालावधीतच गुळाची मागणी करीत हाेते, त्यांनी काेराेनाच्या साथीत नियमित गुळाचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.
काेट....
गावात मात्र साखरच
शहरातील नागरिक गुळाचा वापर करीत असले तरी ग्रामीण भागातील नागरिक मात्र साखरेचीच मागणी करतात. गुळाची मागणी केवळ संक्रांतीच्या कालावधीतच हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानांमध्ये वर्षभर गूळ विक्रीसाठी ठेवला जात नाही.
- रामदास बाेबाटे, दुकानदार
काेट....
प्रकृतीसाठी गूळ चांगला
पूर्वीचे नागरिक गाेड पदार्थ तयार करण्यासाठी गुळाचा वापर करीत हाेते. गूळ तयार करताना काेणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जात नसल्यास ताे प्रकृतीसाठीही चांगला राहतो. साखरेपेक्षा गूळ खाणे आराेग्यासाठी लाभदायक आहे.
- सुधीर साेमनकर, आहार तज्ज्ञ
बाॅक्स...
हे आहेत गुळाचे फायदे
- गुळामध्ये कॅल्शियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, लाेह, व तांबे यांचे प्रमाण असते.
- राेगप्रतिकार शक्तीत वाढ हाेते, रक्तदाब कमी हाेतो, हिमाेग्लाेबिन व स्मरणशक्तीत वाढ हाेते.
- गूळ खाण्यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडण्यास मदत हाेते.
- अलीकडच्या महिलांना गुळापासून इतर पदार्थ बनविता येत नाहीत. त्यामुळे गुळाचा सर्वाधिक वापर कच्चा खाण्यासाठी तसेच चहा बनविण्यासाठी केला जाते.
बाॅक्स...
गुळामध्येही भेसळ
उष्णतेने उसाच्या रसाला आटवून तयार झालेला पदार्थ म्हणजे गूळ हाेय. पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करताना काेणताही रासायनिक पदार्थ वापरला जात नव्हता. मात्र, अलीकडेच गूळ तयार करण्यासाठी काॅस्टिक साेडा, ऑक्झेलिक ॲसिड, फाॅस्फरिक ॲसिड, बेन्झिन, आदी रासायनिक पदार्थ टाकले जातात. त्यामुळे गूळ खरेदी करताना ताे पारंपरिक पद्धतीने व काेणतेही रासायनिक पदार्थ टाकले नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी.
बाॅक्स.....
२०२०
गूळ - ६५
साखर - ३५
...............
२०२१
गूळ - ७०
साखर - ३८