राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, अंतर्गत केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची आणि इको फ्रेंडली लिविंग फाउंडेशन नागपूर
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पक्ष्यांची पाणपोई’ ही ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली हाेती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात प्रथम क्रमांक अक्षय चलाख यांनी पटकाविला.
आजूबाजूला असलेल्या टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्ष्यांसाठी अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था असलेली एक ‘पक्ष्यांची पाणपोई’ तयार करून त्याचे दोन फोटो ऑनलाइन मागविण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय, व चतुर्थ अशा चार कलाकृतींना अनुक्रमे ६ हजार रुपये, ४ हजार, २ हजार, व १ हजार रुपये तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक ठेवण्यात आले होते. प्रवेशिका सादर करणाऱ्या प्रत्येकाला ई-मेलवर डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वांच्या प्रवेशिका तीन परीक्षकांकडे ऑनलाइन तपासणीसाठी पाठविण्यात आल्या व त्यानुसार निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक चामाेर्शी येथील अक्षय चलाख, द्वितीय क्रमांक प्रणाली कपट, तृतीय क्रमांक त्रिवेणी लांजे मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली यांनी तर निकिता चौधरी संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर, जळगाव यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला. प्रत्येक स्पर्धकांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना त्यांचे पारितोषिक स्मृतीचिन्हासह त्यांच्या पत्यावर पाठविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षण डॉ. विजय लिमये, संजय वलीकर, शिवालिका अरोरा यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, प्राचार्य डॉ. एस. डी. निमसरकार, रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. पवन नाईक, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. प्रदीप चापले यांनी सहकार्य केले.