घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागात कव्हरेजची समस्या वर्षभर कायम राहते.
दुधाळ गायींच्या वाटपास दिरंगाई
आरमाेरी : बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. ते सांभाळण्यास त्रास हाेत आहे. शेतकऱ्यांना दुधाळ गायींचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.
जलद बसेसना थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांंव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे.
तांत्रिक अडचणी दूर करा
आलापल्ली : जिल्ह्यातील अनेक गावात नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी अजूनही दूर झालेल्या नाहीत. प्रशासनाने अडचणी दूर कराव्यात.
तंमुस नाममात्रच
आष्टी : तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र, सद्य:स्थितीत या समित्या थंडबस्त्यात आहेत. गावांमध्ये अवैध धंदे वाढत आहेत.
वाहनांवर कारवाई करा
भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. त्यामुळे विमा आवश्यक आहे. विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईची गरज आहे.
वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार
गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात दाेन हजारपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूडतस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मोकळी मैदानेही कचऱ्याचे केंद्र बनली आहेत. परिणामी डास व कीटकांची उत्पत्तीत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आलेली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.
हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मंदिर जीर्णावस्थेत आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून, ते वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.
झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत.
पोर्ला बसस्थानकाजवळ गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेतात. त्यामुळे येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले.
सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमा सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
देसाईगंज : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याची मागणी
गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने घसरून अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.
झुडपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात
धानोरा : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, यातील बहुतांश गावांतील तलावामध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सरपणासाठी महिला जंगलात
घाेट : आर्थिकदृष्ट्या गॅस सिलिंडर परवडणारा नाही तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्यप्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडर तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एटापल्लीतील अनेक शाळा विजेविनाच
एटापल्ली : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
रोजगार हमीची कामे सुरू करावी
चामाेर्शी : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषिक्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे. बेराेजगारी वाढतच आहे.