गांधीनगरातील कामाची पाहणी : काम उपलब्ध करून देण्याचे निर्देश तालुका प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : गांधीनगर येथे सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाला आ. क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन मजुरांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वर्षातून किमान दोनवेळा मजूर काम करीत असलेल्या ठिकाणाला आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी हितगूज साधावी, त्यांच्याशी चर्चा करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. गांधीनगर येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्राम पंचायत सावंगीच्या वतीने रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. या कामावर शेकडो मजूर काम करीत आहेत. आ. क्रिष्णा गजबे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार सोनवाने, नायब तहसीलदार उपेश अंबादे, गटविकास अधिकारी भांगरे, सरपंच बुल्ले, उपसरपंच बनकर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कामापासून जवळच असलेल्या एका झाडाच्या खाली बसून आमदारांनी मजुरांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर ग्राम पंचायतीच्या मार्फतीने करण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. उन्हाळ्यामध्ये रोजगाराचे साधन उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्राम पंचायतीने जास्तीत जास्त मजुरांना रोजगार मिळेल, या दृष्टीने कामाचे नियोजन करावे, तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्याने दुपारी उशिरापर्यंत काम करण्याचे टाळावे, असा सल्लाही यावेळी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले.
आमदारांनी जाणल्या मजुरांच्या समस्या
By admin | Published: May 06, 2017 1:24 AM