कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. कित्येक वर्षांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गतिरोधकाचा अभाव
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून अवजड वाहनांचेही आवागमन असते.
अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात
जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावातील पांदण अतिक्रमणात आहेत.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे.
आलापल्लीतील थ्रीजी सेवा कुचकामी
आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्रीजी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्रीजी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टूजी सेवेप्रमाणे आहे.
लघु सिंचन इमारत जीर्ण
अहेरी : येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय शहरात अनेक शासकीय कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविले जात आहेत. त्यामुळे अडचण येत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
रस्ता बांधकाम करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने, नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. पावसाळ्यात अनेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते.
वाहनांना आवर घाला
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावेत.
वडधात वीज समस्या
आरमोरी : वडधा व देवीपूर परिसरातील वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने कृषिपंपामार्फत भाजीपाला पिकाला पाणी देण्यास अडचण येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने येथे नियमित वीजपुरवठा करावा.
वन पर्यटनस्थळे दुर्लक्षित
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास मनोरंजनाचे साधन उपलब्ध होऊ शकते.
डासांनी मांडला उच्छाद
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
वाहनांचा लिलावच नाही
गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे. सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात शाळांच्या इमारती खराब आहेत.
नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील नाल्यामागील अनेक दिवसांपासून उपसण्यात आल्या नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे नाल्या लवकरच तुंबतात. कारवाई करण्याची मागणी आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.
फवारणी करा
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.