भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या नेलगुंडा गावात धाेडराज पाेलीस मदत केंद्राच्या वतीने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पाेलिसांनी लाेकांच्या व परिसरातील समस्या जाणून घेतल्या. शासकीय याेजनांच्या लाभासाठी नागरिकांनी पाेलीस मदत केंद्रात विहित कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.
नक्षलविराेधी अभियान राबवित असताना धाेडराज पाेलिसांनी नेलगुंडा गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान पाेलिसांनी गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. नेलगुंडा व गाेंगवाडा येथे विद्युतजाेडणी व रस्ता बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे. इरपणार, माेराेमेट्टा, मर्दमलिंगा, पिटेकसा, जुव्ही आदी गावांमध्ये बाेअरवेल मंजूर आहे. इरपणार येथे साैर हायमास्ट तसेच परायणार व इरपणार येथे सिमेंट काॅंक्रिट रस्ते आदी कामे पाेलीस विभागाच्या पाठपुराव्यामुळे मंजूर आहेत, अशी माहिती प्रभारी अधिकारी बाबासाहेब दुधाळ यांनी दिली. तसेच पाेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील युवक-युवतींना पाेलीस भरतीबाबत मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनी प्राेजेक्ट विकासअंतर्गत शासकीय याेजनांचा लाभ घ्यावा. इंदिरा गांधी वृद्धापकाळ याेजना, संजय गांधी निराधार याेजना, कुटुंबलाभ अर्थसहाय्य याेजना, बिरसा मुंडा विहीर बांधकाम याेजना, सिंचन याेजना आदींसह अन्य याेजनांचा लाभ घेण्यासाठी महिला, पुरुष, शेतकरी व विद्यार्थ्यांनी विहित कागदपत्रे धाेडराज पाेलीस मदत केंद्रात जमा करावी. याआधारे पात्र नागरिकांना याेजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन प्रभारी अधिकारी बाबासाहेब दुधाळ यांनी दिले.
बाॅक्स
डिझेल इंजिनच्या वापरातून फुलविला भाजीपाला
धाेडराज पाेलीस मदत केंद्राच्या वतीने पाेलीस प्रशासनामार्फत मागील जनजागरण मेळाव्यात नेलगुंड्यातील नागरिकांना डिझेल इंजिन भेट देण्यात आले हाेते. या इंजिनचा वापर करून नागरिकांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या भरघाेस भाजीपाला निघत असून, यातून बऱ्यापैकी नफा मिळत असल्याचे नागरिकांनी मेळाव्यात सांगितले.