उपवनसंरक्षक अनभिज्ञ : व्यथा मांडण्यासाठी इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदतप्रशांत ठेपाले आलापल्लीआलापल्ली येथील ‘वनसंपदा’ या भव्य इमारतीमधून आलापल्ली व भामरागड या दोन वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाचा कारभार चालविला जातो. मात्र भामरागड वन विभागाच्या उपवनसंरक्षकाला स्थानिक भाषा तसेच मराठी व राष्ट्रभाषा हिंदीसुद्धा येत नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते.गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, आलापल्ली, भामरागड हे तीन महत्त्वाचे वन विभाग आहेत. या तिन्ही वन विभागाला परराज्याच्या सीमा लागून असून येथे अवैध वृक्षतोड व नक्षलवाद ही सर्वात मोठी समस्या आहे. सिरोंचा वन विभागाचे स्थानांतरण वन विभागाने काही वर्षांपूर्वी केले असले तरी या वन विभागाचे वाहन दुरूस्ती विभाग व एक सहायक उपवनसंरक्षक कार्यालय अद्यापही आलापल्ली येथेच आहे. तर वनसंपदा या इमारतीमध्ये आलापल्ली व भामरागड अशी दोन कार्यालय असून यापैकी भामरागड वन विभागाची हद्द आलापल्लीपासून १५ ते २० किमी अंतरापासून सुरू होते. जिथे त्यांचे कार्य नाही, अशा ठिकाणी भामरागड वन उपसंरक्षक कार्यालय आहे. वन विभागाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर वनवृत्तात पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वन विभागाचा समावेश होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी लोकमतने स्वतंत्र गडचिरोली वनवृत्तासाठी वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर वन विभाग खळबळून जागे झाले आणि स्वतंत्र गडचिरोली वनवृत्ताची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून वन विभागाचा कारभार जुन्याच पद्धतीने सुरू आहे. वन विभागाने वनक्षेत्र कार्याची पुनर्रचना करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता शासनाने गडचिरोली वनवृत्ताची निर्मिती करून गडचिरोली वनवृत्त वेगळे केले. मात्र या वनवृत्तामध्ये येणाऱ्या वन विभागाचे व परिक्षेत्राची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्यात आली. वास्तविक वन विभागाचे क्षेत्रफळ तेथील भौगोलिक परिस्थिती आणि इतर गोष्टींचा विचार करून पुनर्रचना करण्याची गरज आहे. मात्र वन विभागाचे या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आधीच समस्यांच्या विळख्यात सापडलेले येथील वनकर्मचारी मोठ्या शिताफीने आपले कर्तव्य पार पाडीत असतात. मात्र त्यांच्या समस्या ते आपल्या अधिकाऱ्यांजवळ सांगू शकत नाही. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमा आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या तीन वन विभागाला लागून आहेत. त्यामुळे या तिन्ही वन विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून चांगल्या अनुभवी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. जेणेकरून संबंधित अधिकाऱ्याला या भागातील कर्मचाऱ्यांच्या व आपल्या वन विभागाच्या समस्यांची जाण राहील. मात्र मागील काही वर्षांपासून नवनियुक्त आयएफएस अधिकाऱ्यांना या वन विभागात आणून बसविल्या जात आहे. परिविक्षाधिन वनाधिकारी पाठवून शासन नेमके काय साध्य करीत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)मराठी भाषिक, अनुभवी अधिकाऱ्यांची गरजभामरागडचे उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांना या भागातील स्थानिक भाषा येत नाही. तसेच मराठी व हिंदीही भाषा परिपूर्णरित्या येत नाही. जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांना मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी, माडिया या भाषेचे ज्ञान आहे. मात्र या भाषेचे ज्ञान नसणाऱ्या वनाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या समस्या इंग्रजी भाषेत कोण सांगणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या या संबंधित वनाधिकाऱ्यांना एकातांत सांगण्यासारख्या असतात. मात्र स्थानिक व मराठी, हिंदी भाषा येत नसलेल्या अधिकाऱ्यांपुढे वन कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरित्या समस्या समजावून सांगता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनासुद्धा स्थानिक भाषेचे ज्ञान नाही. मात्र हिंदी व मराठी भाषा थोडीफार प्रमाणात बोलता येते. भाषेच्या अडचणीमुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या अद्यापही कायम आहेत.
वन विभागाच्या कामात स्थानिक भाषेची अडचण
By admin | Published: May 25, 2016 1:44 AM