अहेरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
ताेट्यांअभावी पाणी वाया
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगर परिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
गुड्डीगुडम परिसरात कव्हरेजची समस्या
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात माेबाइल टाॅवर नसल्याने कव्हरेजची समस्या आहे. लाेकांकडे असलेले ॲंड्राॅईड माेबाइल इंटरनेटवरील कामाशिवाय कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गुड्डीगुडम येथे टाॅवरची निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण
आलापल्ली : जिल्ह्यात अवैधरित्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैर मार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सिरोंचात डुकरांचा हैदोस
सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
दुधाळ गाईंचे वाटप करा
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
मोहझरीतील रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही.
पथदिव्यांअभावी अंधार
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे. परंतु या मागणीकडे पालिकेचे दुर्लक्ष हाेत आहे.
रांगीमार्गे अवैध वाहतूक
चातगाव : चातगाव रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे.
शिधापत्रिका अद्यावत करा
सिरोंचा : सार्वजनिक वितरण प्रणाली अद्यावत करण्यासाठी राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शिधापत्रिकेवर नाव नाेंदणी हाेऊनही तीन ते चार महिन्यांपर्यंत संगणकीकरण हाेत नसल्याने लाेकांना धान्याचा लाभ मिळत नाही.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजी आहे.
पाेर्लात फवारणी करा
गडचिरोली : नजीकच्या पाेर्ला येथील अनेक वाॅर्डातील अनेक नाल्या साचल्या आहेत. तसेच परिसरात मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. त्यामुळे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गावातील काही भागात नाल्या तुंबल्याचे दिसून येते.