विजेचा कमी दाब : महेंद्रकुमार मोहबंशी यांची मागणीकुरखेडा : येथे असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार होत असल्याने शहरात कमी विद्युत दाबाचा पुरवठा तसेच ग्रामीण भागात अघोषित लोडशेडिंग करावी लागत आहे. कमी विद्युत दाबामुळे अनेक घरगुती उपकरणे निकामी होत आहेत. त्यामुळे महावितरणने १३२ केव्ही उपकेंद्र (पारेषण) चे बांधकाम करावे, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केली आहे. तालुक्यात मोठा कारखाना नसला तरी कृषी मोटारपंप, घरगुती मोटारपंप व इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांची मागणी वाढत चालली आहे. मागील वर्षीपर्यंत १ हजार ५०० कृषिपंपांचा भार या उपकेंद्रावर होता. यावर्षी ५०० नवीन कृषीपंपांची भर पडली आहे. शासकीय योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळत असल्याने विहिरींचे बांधकाम झाल्याबरोबरच शेतकरी वीज कनेक्शनसाठी अर्ज करतात. खासगी बोअरवेल खोदण्याकडेही शेतकऱ्यांचा ओढा वाढत चालला आहे. कमी वीज दाबामुळे काही वॉर्डांतील डीपींवर अधिक भार होत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात ही समस्या अतिशय गंभीर होते. त्यामुळे कुरखेडा येथे १३२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे बांधकाम करण्यात यावे, या उपकेंद्राद्वारे पुराडा, मालेवाडा तसेच नजीकच्या कोरची, आरमोरी तालुक्यातील उपकेंद्रावरसुद्धा विजेचा पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी उपकेंद्र बांधणे आवश्यक झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडात १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 1:34 AM