लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : स्वत:ला उच्चशिक्षीत मानणारे शहरातील नागरिक कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र ग्रामीण भागात अजुनही कार्यक्रमांसाठी झाडाच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण तयार केले जातात. त्यामुळे येथील कार्यक्रम प्लास्टिकमुक्त होतात. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक सांगून फिरत नसले तरी ते अप्रत्यक्षपणे पर्यावरणप्रेमी असल्याचे दिसून येते.प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. जाळल्यास अत्यंत विषारी वायू तयार होतात. हे सर्व प्लास्टिक वापराचे तोटे आहेत. शहरी भागातील नागरिक, कर्मचारी, व्यापारी वर्गाला प्लास्टिकच्या वापराचे कोणते दुष्परिणाम आहेत, हे माहित आहेत. याबाबत अनेकदा भाषणेही झोडली जातात. मात्र शहरातील अपवाद वगळता प्रत्येक कार्यक्रमात प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केला जातो. बोलायचे वेगळे व करायची कृती वेगळी, अशी स्थिती शहरातील नागरिकांची असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील नागरिक मात्र बोलत नसले तरी ते करून दाखवितात. दुर्गम भागातही अनेक समारंभ होतात. या समारंभादरम्यान शेकडो नागरिकांचे सामुहिक जेवन राहते. या सामुहिक जेवनासाठी पळस, मोह व इतर झाडांच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण तयार करतात. या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त खर्च होत नाही. तसेच या सर्व वस्तू पर्यावरणपुरक आहेत. विशेष म्हणजे, जंगलातून पाने आणण्यापासून ते द्रोण व पत्रावळी तयार करण्यासाठी गावातील महिला, पुरूष मदत करतात. या मदतीच्या माध्यमातून गावातील एकोपा टिकण्यास मदत होते. ही बाब शहरातील नागरिकांनी शिकण्याजोगे आहे.
दुर्गम भागातील कार्यक्रम होतात अजूनही प्लास्टिकमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 6:00 AM