ऑनलाइन लोकमत
अहेरी, दि. 17 - तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे असा स्पष्ट व घणाघाती आरोप सिरोंचा तालुक्यातील वडदम पोचमपल्ली व परिसरातील असंख्य गावकरी आणि शेतकऱ्यांनी आज अहेरी येथील शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी म्हटले की, तेलंगणा सरकार अशिक्षित व अडाणीपणाचा फायदा घेत असून जमिनीचा मोबदल्यात कवडीमोल भाव देऊन फसवेगिरीचा डाव आखून तेलंगणा सरकार आपला हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे आमच्यासाठी धोकादायक व कुटुंबियांसाठी जीवना मरण्याचा प्रश्न असून जमिनीच्या मोबदल्यात मार्केट रेट प्रमाणे भाव, जमिनीची पर्यायी व्यवस्था व प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातून प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच जमीन देऊ अन्यथा जमीन देणार नाही व याविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असा गर्भगळीत ईशाराही वडदम, पोचमपल्ली व परिसरातील गावकऱ्यांनी व कास्तकारांनी पत्रकार परिषदेत दिला.
गावकरी व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, आमची जमीन वडिलोपार्जित व चार-पाच पिढ्यांपासून वास्तव्यास असून शेत जमीन कसत आहोत परंतु तेलंगणा सरकारचा मेटिगट्टा बॅरेजमुळे आमचे कुटुंबीय उघड्यावर येणार असून आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे अशी भीतीही पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त करून या मोबदल्यात जमिनीतील बाजारभावाच्या योग्य व उच्चीत किंमतीनुसार व शेतात बोरवेल्स असेल तर ती किंमत बेरीज करून तसा मोबदला, वास्तव्यास व पुनर्वसनासाठी जमीन, शेतीकरिता सुपीक शेतजमीन, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय नौकरी, आणि नव्याने जीवन स्थापित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब प्रमुखाला पेन्शन लागू करण्यात यावे अशी एकमुखी व तीव्र मागणी तेलंगणा व महाराष्ट्र शासनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत करून आपली कैफियत व व्यथा मांडले. व त्या नंतर तसे निवेदनही अहेरीच्या उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले.
पत्रकार परिषदेत सरपंच चंद्रय्या किष्टय्या सिंहानेनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेल्ली लिंगय्या, चल्ला शकरय्या बंगारू, आकुला व्येंकन्ना, गोरे व्येंकटेश राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरुपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमुला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या आदी व असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.