लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून ग्रा.पं. व पं.स. स्तरावरून जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठविला जात आहे. मात्र नवीन ग्रा.पं. निर्मितीचा निर्णय रखडलेला आहे. ग्रा.पं. विभाजनाच्या प्रस्तावाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही.आरमोरी तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायती असून अनेक गावे मिळून बनलेल्या गट ग्रामपंचायती आहेत. एक हजार लोकसंख्ये मागे एक ग्रामपंचायत असावी, असा शासनाचा निकष आहे. वडधा ग्रामपंचायती अंतर्गत डार्ली, वडधा, देशपूर, कुरंजा, देवीपूर, टेंभाचक, चिचोली आदी गावे येतात. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असल्याने वडधा ग्रामपंचायतीचे विभाजन करून डार्ली व देशपूर या दोन ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात याव्या, असा ठरावही वडधा ग्रामपंचायतीने घेतला आहे. डार्ली व टेंभाचक ही दोन गावे मिळून १ हजार २११ लोकसंख्या आहे. तर देवीपूर, कुरंजा, देशपूर या तीन गावांची लोकसंख्या १ हजार २६ एवढी आहे. त्यामुळे डार्ली व देशपूर या दोन्ही नव्या ग्रामपंचायती लोकसंख्येच्या निकषात बसणार आहे.सिर्सी ग्रामपंचायती अंतर्गत विहिरगाव, सिर्सी, मोहटोला, नरोटी चक, नरोटी माल, गणेशपूर १, गणेशपूर २, कुकडी आदी गावे येतात. सिर्सी ग्रा.पं.चे विभाजन करून विहीरगाव व नरोटी चक या दोन ग्रामपंचायतीने नव्याने निर्माण करण्याचा ठराव जि.प.कडे पाठविण्यात आला आहे. विहीरगाव व मोहटोला ही दोन गावे मिळून विहीरगाव ही नवी ग्रामपंचायत निर्माण होऊ शकते. दोन्ही गावाची मिळून एकूण लोकसंख्या १ हजार २०१ आहे. नरोटी चक व नरोटी माल ही दोन गावे मिळून नरोटी चक ही दुसरी ग्रामपंचायत निर्माण करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला असून या दोन गावाची लोकसंख्या १ हजार १४ एवढी आहे. नरचुली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लहान-मोठ्या गावांचा समावेश आहे. नरचुली ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ २० ते २५ किमीचे आहे. लहान-मोठ्या कामासाठी नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी पायपीट करावी लागते. त्यामुळे नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन करून जांभळी ही नवी ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. जांभळी व दवंडी या दोन गावाची लोकसंख्या ३ हजार १४१ आहे. त्यामुळे ही दोन्ही गावे मिळून जांभळी ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव ग्रा.पं. व पं.स.स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पळसगाव ग्रामपंचायतीचे विभाजन करून पाथरगोटा ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव आहे.दाखल केलेल्या नव्या ग्रा.पं. निर्मितीच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही झाली नाही. मात्र जि.प.ने यावर्षी पुन्हा ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव मागितले आहे. यावेळी सुध्दा प्रशासन काय कार्यवाही करते की नेहमीप्रमाणे प्रलंबित ठेवले जाते,याकडे लक्ष आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्मितीचे प्रस्ताव रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:51 AM
तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सहा ग्रामपंचायती निर्माण करण्यात यावे,
ठळक मुद्देविकासावर परिणाम : जि.प.ने नव्याने मागितले विभाजनाचे प्रस्ताव