लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळण्याचा निर्णय आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी अडला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व त्रुटी दूर करून मुख्य वनसंरक्षकांमार्फत पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच ती जागा जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित केली जाईल. त्यानंतरच संकुलाच्या उभारणीस सुरूवात होऊ शकेल.वनविभागाच्या त्या जागेचा मोबदला म्हणून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आधी १ कोटी २९ लाख आणि नंतर पुन्हा १८ लाख रुपये वनविभागाला दिले आहे. सोबतच वनकायद्यानुसार राजोली येथील १४ हेक्टर महसूल विभागाची जागाही वनविभागाला देण्यात आली. मात्र नियमानुसार वनविभागाची जागा इतर विभागाला देताना कराव्या लागणारी प्रक्रिया केली नसल्याने जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव पुढे सरकत नव्हता. आता त्यातील सर्व त्रुटी दूर करून तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य वनसंरक्षकांमार्फत पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्या ठिकाणी मंजुरी मिळण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा करावा लागणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी पोटेगाव मार्गावरील लांझेडा परिसरात ६.९६ हेक्टर जागेवर सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी २४ कोटी २७ लाख रुपये खर्चातून विविध सोयीसुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र क्रीडा विकास प्राधीकरणाने मंजुरी दिली आहे. मात्र ज्या जागेत हे क्रीडा संकुल उभारले जात आहे ती वनविभागाची जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याची किचकट प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून अजून पूर्ण झालेली नाही.खेळाडू व क्रीडाप्रेमींना प्रतीक्षाजिल्हा क्रीडा संकुलातील प्रस्तावित सुविधांमध्ये ४०० मीटर रनिंग ट्रॅक, ५ बॅडमिंटन कोर्ट असलेला बहुउद्देशिय हॉल, ४० बाय ६० मीटर डोंब असलेले क्रीडांगण, दोन आरसीसी प्रेक्षक गॅलरी, क्रीडा विभागाची कार्यालयीन इमारत, अद्यावत व्यायामशाळा आणि १२० खाटांचे वसतिगृह अशा सोयी राहणार आहेत. २४ कोटी २७ लाख रुपयांच्या या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली असली तरी कामास होत असलेला विलंब पाहता हा बजेट भविष्यात वाढू शकतो. विशेष म्हणजे या खर्चाची तरतूद सुद्धा कुठून करायची हे अद्याप ठरलेले नाही. ही कामे तातडीने मार्गी लावून जिल्ह्यातील खेळाडूंची कुचंबना दूर करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.
क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:31 AM
शहरातील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळण्याचा निर्णय आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी अडला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व त्रुटी दूर करून मुख्य वनसंरक्षकांमार्फत पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
ठळक मुद्देसीसीएफकडून प्रस्ताव : मंजुरी मिळताच होणार जागेचे हस्तांतरण