वनमंत्री सुधीर मुनगंटीवार : वन प्रशासकीय भवनासह वन संकुलाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क $$्रिगडचिरोली : मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता, बांबू आणि मोहफुलासारख्या वनोपजावर प्रक्रिया उद्योग आल्यास या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये मोठी समृद्धी येईल आणि त्यांचे जीवनमान बदलेल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी वनविभागाची तयारी सुरू आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय असलेल्या वन प्रशासकीय भवन आणि वनसंकुल वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील पोटेगाव मार्गावर असलेल्या या इमारतीचे उद्घाटन वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी झाले. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, राज्याचे वन सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर) श्री भगवान आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम फित कापून आणि नामफलकाचे अनावरण करून ना.मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय असलेल्या वन प्रशासकीय भवनाचे आणि वन संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागात करण्यासारखी खूप कामे आहेत. पण अधिकारी या जिल्ह्यात येण्यास इच्छुक नसतात, कारण त्यांना हव्या त्या सुविधा गेल्या कित्येक वर्षात मिळाल्या नाहीत. वनमंत्रीपदासोबत वित्तमंत्रीही मीच असल्यामुळे पुरेशा मनुष्यबळासोबत निवासी संकुलांची व्यवस्था आता केली. अजून काय पाहीजे ते मागा, ते दिले जाईल, असा विश्वास वनमंत्र्यांनी दिला. वनक्षेत्राला लागून शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई दुप्पट केली आहे. आता अशा शेतांना कुंपन घालण्याची योजनाही आणत असल्याची माहिती त्यांनी दिली. बांबूच्या उत्पादनातून ग्रामपंचायतींना १४ कोटी २३ लाख रुपये मिळाले. तेंदूपानातून मिळणारे उत्पन्न तर त्यापेक्षाही जास्त आहे. आता मोहफुलावरील बंदी उठविली असून योग्य व्यवस्था केल्यास त्यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या खिशात २२० कोटी रुपये येतील, असे मुनगंटीवार म्हणाले. मोहफुलात सफरचंदापेक्षा १० पट जास्त पोषक घटक आहेत. त्यामुळे त्यावर प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार निर्मिती करता येईल, असे ते म्हणाले. यावेळी वनसचिव विकास खारगे म्हणाले, राज्यात सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. जंगलातून केवळ महसूल मिळविणे हा आता हेतू नाही तर आदिवासी लोकांना केंद्रस्थानी ठेवून वन व्यवस्थापन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे नियोजन स्पष्ट करणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच सुबक वास्तू वेळेत तयार केल्याबद्दल अधीक्षक अभियंता प्रदीप खवले व इतर अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रक्रिया उद्योगातून येईल समृद्धी
By admin | Published: May 27, 2017 1:09 AM