पेसा कायद्याच्या मुद्यावरून : महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली निदर्शने गडचिरोली : आणखी ५० वर्ष पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा होणार नाही, असे भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी रविवारी युवक काँगे्रस कार्यकर्त्यांच्या उपोषण मंडपात भेट देऊन स्पष्ट सांगितले. आमदारांच्या या वक्तव्याचा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.बुधवारी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या येथील इंदिरा गांधी चौकात जमा होऊन आ. डॉ. देवराव होळी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत निदर्शने केली. गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे आदींसह विविध मागण्यांना घेऊन युवक काँगे्रसचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथील इंदिरा गांधी चौकात रविवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आॅगस्ट क्रांतिदिनी खा. अशोक नेते व आ. डॉ. देवराव होळी यांनी उपोषण मंडपात येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान आ. डॉ. देवराव होळी यांनी पेसा कायद्याच्या अधिसूचनेवर बोलताना आणखी ५० वर्ष पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांना स्पष्ट सांगितले. यानंतर युवक काँग्रेसच्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. डॉ. देवराव होळी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, रविवारी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात येऊन आ. डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात नारेबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.यावेळी नगर सेविका लता मुरकुटे, पुष्पा ब्राह्मणवाडे, देसाईगंजच्या नगरसेविका निलोफर शेख, शमा अली, नंदा माळवणकर, प्रतीभा जुमनाके, नीळा निंदेकर, संध्या बुटले, नीता पित्तुलवार, पौर्णिमा भडके, दीपा माळवणकर, ज्योती गव्हाणे, नीशा बोदेले, जया बांबोळे आदींसह बहुसंख्य महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)युकॉच्या उपोषणाला पाठिंबा वाढतीवरयुवक काँग्रेसच्या वतीने रविवारपासून इंदिरा गांधी चौकात बेमूदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या चवथ्या दिवशी बुधवारी जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, नगरसेवक नंदू कायरकर, पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम, नियोजन सभापती विजय गोरडवार, लता मुरकुटे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, रमेश चौधरी, सुधीर भातकुलकर, अनिल म्हशाखेत्री यांनी भेट दिली.आमदारांनी गैरआदिवासींची माफी मागावी - वानखेडेपेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा होणार नाही, असे वक्तव्य आ. डॉ. देवराव होळी यांनी केल्यामुळे गैरआदिवासी नागरिक नाराज झाले आहेत. आ. डॉ. होळी यांनी जिल्ह्यातील सर्व गैरआदिवासी जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा महिला काँग्रेसतर्फे पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी निदर्शने दरम्यान दिला.
भाजप आमदाराच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Published: August 13, 2015 12:09 AM