गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला विभागणाऱ्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड प्रशासनाकडून उभारल्या जात असलेल्या पुलाला विरोध करण्यासाठी छत्तीसगड हद्दीत गेल्या ४ जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. लगतच्या गावांमधील लोक नदीकाठी ठिय्या देऊन असून तिथेच त्यांनी तात्पुरती राहुटी केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या आंदोलनाला एटापल्ली तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
छत्तीसगड सीमेतील बिजापूर जिल्ह्याच्या नुगूर या गावाजवळ इंद्रावती नदीवर पुलाची उभारणी होत आहे. हा भाग अनेक वर्षांपासून नक्षल्यांचा गड समजला जातो. त्यामुळे छत्तीसगड प्रशासनाकडून पोलिस संरक्षणात हे काम सुरू होते. मात्र, त्या भागातील नागरिकांना त्या परिसरात वर्दळ आणि बाहेरील लोकांचा हस्तक्षेप नको आहे. अबुझमाड क्षेत्रातील खनिज काढण्यासाठीच प्रशासनाकडून रस्ते, पुलांची निर्मिती केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. यामुळे जल, जंगल, जमिनीवरील आदिवासींचा हक्क हिरावला जाईल, असा त्यांना संशय आहे. छत्तीसगड प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिले. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे एटापल्ली तालुका भाकपाचे सचिन मोतकुरवार यांनी कळविले आहे.
शासनाने आतापर्यंत त्या भागात रुग्णालय, शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या नसल्याचा आरोप छत्तीसगड प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
हे आंदोलन महाराष्ट्राच्या हद्दीत नाही. महाराष्ट्राच्या हद्दीतील लोक जर त्यात सहभागी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल आणि विकासाला चालना देण्यासाठी पुलाचे बांधकाम का गरजेचे आहे हे त्यांना सांगितले जाईल.
- शुभम गुप्ता, उपविभागीय अधिकारी, एटापल्ली.