आलापल्ली (गडचिरोली) : सूरजागड पहाडीवरील लोहखनिज वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आलापल्ली-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते ११ जुलै रोजी बोरी येथे रस्त्यावर उतरले. यावेळी भरपावसात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी पोस्टर झळकावून आंदोलकांना निघून जा, अन्यथा कारवाईचा इशारा दिला.
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची आवागमन वाढले आहे. मात्र, या वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहनांची कोंडी होते. परिणामी विद्यार्थ्यांना तासनतास रस्त्यात अडकून थांबावे लागते. या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले.
आलापल्ली-आष्टी मार्गावरील लोहखनिज वाहतूक बंद करावी, मदीगुडम येथील ट्रक व इतर वाहनांची पार्किंग बंद करावी, मदीगुडम येथील जंगलाचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, आष्टी-आलापल्ली मार्गाचे काम वेगाने करावे. या रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांस ३० लाख रुपये व कायम दिव्यांगत्व आलेल्यास १५ लाख व जखमींना ५ लाख रुपये करावी, नियमबाह्य बनविलेल्या रस्त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, वेलगूर टोला-वडलापेठ रस्त्याचे रुंदीकरण करावे, आलापल्ली-सिरोंचा मार्गावर जशी जड वाहतूक बंद केली आहे त्याप्रमाणे आलापल्ली-आष्टी मार्गावर जड वाहतूक बंद करण्यात यावी, अहेरी-आवलमरीख रस्ता करावा, चाैडमपल्ली हा चपराळा अभयारण्याचा भाग असून येथून जड वाहने नेण्यास प्रतिबंध करावा, अशा १४ मागण्या करण्यात आल्या. आविसं नेते अजय कंकडालवार, रवींद्र आत्राम, शैलेश पटवर्धन, नंदू नरोटे, अजय आत्राम आदी उपस्थित होते.
उपाययोजना करण्याचे आश्वासन
उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड, प्रभारी तहसीलदार फरीद शेख, पोनि. किशोर मानभाव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. योग्य ती कार्यवाही करून उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.