आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम, चपराळा येथे महाशिवरात्रीला दरवर्षी यात्रा भरते. मात्र, या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
मोहझरीत खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावेत, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही.
अतिक्रमणामुळे अपघात
धानोरा : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिक्रमणामुळे धानोरा शहराच्या परिसरात दुचाकी अपघात वाढले आहेत.
जिल्ह्यात उद्योग उभारण्याची मागणी
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.
बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न. प.चे दुर्लक्ष होत आहे.
दुर्गम भागात कर्मचारी राहातच नाहीत
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेले कर्मचारी दररोज अप-डाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहात नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने, गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.
हूक टाकून विजेची चोरी सुरूच
वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता
गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्ती नाही
झिंगानूर : झिंगानूर - सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
गडचिराेली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्याप जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वन हक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
चातगावात कव्हरेजची समस्या भारी
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
धोडराज मार्गावर खड्डे, वाहनधारक त्रस्त
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली. अहेरी उपविभागाच्या विकासासाठी निधी येत असला तरी त्याचा विनियाेग दिसून येत नाही.
शहरातील नाल्या गाळाने बुजल्या
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बसथांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील वन्यपशुंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
हागणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालये आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याकडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचा या समस्येकडे कानाडाेळा हाेत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या दहन शेड मोडकळीस आल्या असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी अनेक अडचणी येतात. स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.