अहेरी नगरातील जवळपास ११५ कुटुंब हे ग्रामपंचायत काळापासून इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल बांधकाम करून वास्तव्यास आहेत. त्यानुसार गृहकर पावती, पाणी कर, नमुना ८ व वीजबिल भरणा नियमित करून त्यांच्या सर्व पावत्या त्यांच्याकडे आहेत. त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ त्याखालील त्यांच्या सुप्त भोगवटदार याअंतर्गत जागेचा पुरावा म्हणून सनद प्रत प्राप्त झाली होती. परंतु नगरपंचायत अंतर्गत त्या लाभार्थ्यांना जागेच्या सनद प्रत नसल्यामुळे त्यांना पंतप्रधान आवाससारख्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे बेघर कॉलनी येथील काही कुटुंबांकडे जागेचा पुरावा नाही. अशा सर्व कुटुंबांना उपविभागीय कार्यालयाकडून मोका पंचनामा करून सनदची प्रत देण्याची मागणी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदन देतेवेळी जि. प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, अहेरीचे नगरसेवक शैलेश पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार उपस्थित होते.