काेरची : जिल्ह्यात जांभूळ फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. जांभूळ हे फळ अनेकजण खरेदी करतात. जांभळावर प्रक्रिया उद्योग व उत्पादन वाढीसाठी कमतरता आहे. यातून राेजगार निर्मिती शक्य आहे.
दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहेत. यामुळे रात्री नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरतात.
फवारणी करा
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदा फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
रुग्णवाहिका वाढवा
गडचिरोली : गावपातळीवरील रुग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने रुग्णालयात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आपल्या प्राणाला मुकावे लागते. रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी आहे.
मरपल्ली मार्ग दुरवस्थेत
अहेरी : अहेरी-सिरोंचा मार्गावरील उमानूरपासून मरपल्लीपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणची गिट्टी उखडल्याने दुरवस्थेत आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची दुर्दशा झाली असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
प्रवासी निवारा बांधा
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील कुलकुलीच्या पुढे नवरगाव फाट्यावर बसथांब्यावर प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नवरगाव, रामटोला येथील नागरिकांनी केली आहे. नवरगाव फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने लाेकांना त्रास सहन करावा लागताे.
मूल मार्गावरील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : इंदिरा गांधी चाैकापासून मुख्य मार्गाच्या बाजूला काही नागरिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणासाठी बाजूची नाली बुजविली जात आहे. एका बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. महिला व वयाेवृद्ध वाहनचालकांना वाहन वळविताना त्रास हाेत आहे.
चामोर्शी-मूल मार्गावरील झुडुपे तोडा
चामोर्शी : भेंडाळा-चामोर्शी-मूल मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडुपांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या मार्गावरील झुडुपे तोडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
आलापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अंगणवाड्यांचे बांधकाम अपूर्ण
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षाच्यावतीने तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४३५ अंगणवाडी केंद्राचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ३४२ वर कामे पूर्ण झाले असून, अनेक अंगणवाड्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहेत.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी
चामोर्शी : नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर चामोर्शी येथील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रभागवार जमा केलेला कचरा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या व मोठ्या नहराच्या पाळीजवळ तसेच परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र घाण दिसून येते.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
आष्टी येथे पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आष्टी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. प्रशासनाने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
ओपनस्पेसमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला
देसाईगंज : न. प. प्रशासनाच्यावतीने लाखो रुपये खर्च करून वॉर्डा-वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने त्यामध्ये कचरा टाकला जात आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले
मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.
टिपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या
कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़. शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़.
दुग्धसंस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्नेहनगरात जंतूनाशक फवारणी करा
गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना व इतर रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतूनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
गोगावनजीकचे नागोबा देवस्थान दुर्लक्षितच
गडचिरोली : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन कि.मी. अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची पंचाईत होते.
गरजूंना भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम् भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्य रेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
रिक्त पदाने कामाचा ताण वाढला
भामरागड : तालुक्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रति तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष हाेत आहे.