गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे हेक्टरवरील शेती कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. शेतकरी फक्त खरीप हंगामातील धान पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के सरासरी पाऊस पडल्याने धान रोवणीची कामेसुद्धा झालेली नाहीत. ऑगस्ट महिना संपत असतानाही पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची धान रोवणी झालेली आहे; परंतु पावसाअभावी ते पीकसुद्धा करपत आहे. मुरमाडी व अमिर्झा परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने दाेन हंगामातील पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. या वर्षी नापिकीची शक्यता असल्याने या परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने गडचिरोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुरमाडीचे सरपंच भोगेश्वर कोडापे, उपसरपंच यशवंत डोईजड, काशिनाथ डोईजड, सचिन भुसारी, फिरोज कोहपरे, गणेश डहलकर, अशोक भुसारी यांनी केली आहे.
बाॅक्स
मुरमाडी-खुर्सा परिसर काेरडाच
गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये तुरळक पाऊस आला. सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजीनद्वारे पाणी देऊन राेवणी आटाेपली. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नव्हती ते शेतकरी जाेरदार पावसाची प्रतीक्षा करीत हाेते. ऑगस्ट महिना संपत असतानाही जाेरदार पाऊस न झाल्याने मुरमाडी, गिलगाव व खुर्सा भागातील शेती काेरडीच दिसून येते.