भेंडाळा : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे चामोर्शी तालुक्यातील काम रेतीअभावी अडले आहे. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यात ७२० घरकुल मंजूर झाली आहेत. चामोर्शी तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून दयावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात वाघोली घाट, हरणघाट, मोहुर्ली, बोरी घाट आहेत. या घाटांवरून चोरट्या मार्गाने नव्हे तर खुलेआमपणे रेतीची तस्करी होत असते. भेंडाळा - हरणघाट मुख्य मार्गावरून दरराेज टॅक्टर, हायवा ट्रक या वाहनांतून रेती वाहतूक केली जाते. रेती तस्करांना आता कुणाचीही भीती वाटत नाही. त्यामुळे ते उघडपणे रोज रेतीची चोरी करत आहेत. तालुक्यात चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ही रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे असल्याने तालुक्यातील हजारच्या घरात असलेल्या घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. वाळू घाटांचे लिलाव बंद असले तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये, यासाठी विनामूल्य पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घ्यावा, अशा मागणीचे पत्र जिल्हा परिषद सदस्या कविता भगत यांनी तहसीलदारांना दिले आहे.