गडचिराेली : शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल बाजारात पाेहाेचविण्यासाठी पांदण रस्ते मजबूत हाेणे अतिशय आवश्यक आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध हाेत नसल्याने बऱ्याच ठिकाणच्या पांदण रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी विविध याेजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एम.डी. चलाख यांनी शासनाकडे केली आहे.
अतिक्रमित रस्ते माेकळे हाेण्यास कच्चे व पक्के पांदण रस्ते निर्मितीच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. माती, दगड, मुरूम टाकून शेताकडे जाणारे कच्चे रस्ते किंवा पांदण रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे. मनरेगा, खासदार, आमदार, स्थानिक विकास निधी, गाैण खनिज विकास निधी यातून पांदण रस्त्यांना निधी उपलब्ध हाेत असताे. याशिवाय ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्वनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती शेष फंड आणि इतर जिल्हा वार्षिक याेजनांमधून मिळणारा निधी खर्च करता येते. राेहयाेतून पांदण रस्त्याला पुरेसा निधी मिळत नाही. काम पूर्ण हाेऊनही देयके प्रलंबित असतात. परिणामी पांदण रस्त्याची कामे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.