याबाबत कोरचीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. प्राणपूर रिठ क्रमांक ५४६, ५४७, ४७३, जागेची मोजणी वन विभागाने २० ऑक्टोबर व ३१ ऑक्टोबर २०२० रोजी केली होती. मात्र, तीन महिने उलटूनसुद्धा अजून जीपीएस नकाशा मिळालेला नाही. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे येथील ग्रामस्थांना त्रास होत आहे. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे तीन महिने लोटूनसुद्धा अधिकारी, कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, उद्या या, परवा या, काम होईल, असे उत्तर देऊन नेहमीच आर्थिक भुर्दंड बसवतात आणि त्रास देत आहेत, अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. १२ फेब्रुवारी २०२१पर्यंत जीपीएस नकाशे न दिल्यास चक्काजाम करण्यात येईल व आपले हक्क मागण्यात येतील, असा इशारा येथील निवेदनातून वडसा वन परिक्षेत्र उपवन संरक्षकांना दिला आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, मुकेश नरोटे, गणेश वरखडे, रामसाय केरामी, जगदीश बोगा, श्रीराम मडावी, दामेसाय केरामी आदी हजर हाेते.