जोगीसाखरा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी योजनांची माहिती देणारे कार्यालय द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
डुक्कर पकडण्याची मोहीम थंडावली
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यापूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
अरततोंडी देवस्थानात सुविधा द्या
जोगीसाखरा : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अरततोंडी येथील महादेव देवस्थान आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु येथील प्राचीन महादेव देवस्थानाचा विकास झाला नाही. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे.
केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे. परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेले महा-ई-सेवा केंद्र अपुरे आहेत. नागरिकांना ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामासाठी अहेरीत येत राहते. शहरातील गांधी चौकातील मुख्य मार्ग अरुंद आहे.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामोर्शी : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटरी उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटरी द्याव्यात, अशी मागणी आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डात अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सोनसरीत मोबाईल सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. विविध दाखले तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन काढावे लागतात. यासाठी इंटरनेट सेवा योग्य असणे आवश्यक आहे.