लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीचे निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यामार्फत हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, ११ लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात ४५ आरोग्य केंद्र तसेच अनेक उपकेंद्र आहेत.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात २५१ खाटांची तर नव्याने सुरू झालेल्या महिला व बाल रूग्णालयात १०० खाटांची व्यवस्था आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता येथे वैद्यकीय अधिकारी रूजू होऊन सेवा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे गडचिरोलीतील अनेक रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त राहतात. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, यादव लोहंबरे, उपतालुका प्रमुख योगेश कुडवे, संदीप दुधबळे, गजानन नैताम, संजय बोबाटे, महेश येनप्रेडीवार, दिवाकर वैरागडे आदी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोलीला मेडिकल कॉलेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:58 AM
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देबांधकाम मंत्र्यांची घेतली भेट : शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी