आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
माहितीसाठी केंद्र द्या
जोगीसाखरा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर योजनांची माहिती देणारे कार्यालय द्यावे.
मुख्यालय सक्तीचे करा
देसाईगंज : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोबाइल सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाइन कामे प्रभावित होत आहेत. विविध दाखले, तसेच प्रमाणपत्रे ऑनलाइन काढावी लागतात.
अरततोंडी देवस्थानात सुविधा द्या
जोगीसाखरा : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अरततोंडी येथील महादेव देवस्थान आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे, परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे अपुरी आहेत. नागरिकांना ६० ते ७० कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने, दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने, ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामांसाठी अहेरीत येत असते. शहरातील गांधी चौकातील मुख्य मार्ग अरुंद आहे.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामोर्शी : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. हे बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी होत आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे, परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त बनले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक वसाहतीचे काम रखडले
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.
अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत, तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत. या इमारती काेसळून माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत, परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.
बसथांब्यानजीक शौचालय बांधा
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावरून भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणांसाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पिशव्यांनी जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक ही जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जीर्ण शाळा इमारती कायमच
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण बनल्या आहेत. पावसामुळे अशा जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केल्या नाहीत.
वैयक्तिक शौचालयांची गावांत कमतरता
गडचिराेली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.
खुल्या जागा ठरताहेत कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसना संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प.ने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी होत आहे.
गाेकुलनगरातील प्रलंबित कामे वाढली
गडचिरोली : गडचिराेली शहराचा सर्वात मागास भाग म्हणून ओळख असलेल्या गाेकुलनगर वाॅर्डात रस्ते, नाली, वीज, पथदिवे आदी मूलभूत समस्या कायम आहेत. माता मंदिर परिसरात बरीच विकास कामे गेल्या दीड वर्षापासून मंजूर करण्यात आली आहेत. मात्र काेराेना प्रादुर्भाव आणि रेती टंचाईच्या कारणामुळे विकास कामे थांबली आहेत.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणीची मागणी
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील डासांमुळे शहरात आजारांचे प्रमाण वाढले असून अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसेसह अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच वाॅर्डातील नाल्यांमध्ये औषध फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
अनेक दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहेत. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
ऑनलाईन सुविधेपासून ग्रामपंचायती वंचित
गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र अजूनही बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाईन झालेल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून त्या वंचित आहेत.