यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिराेंचा तालुक्यांतर्गत येणारी आदिवासी गावे ही अतिदुर्गम, डाेंगराळ व नक्षल भागात आहेत. ही सर्व गावे पेसाअंतर्गत येतात. या भागात १०० टक्के आदिवासी गावे आहेत. आदिवासी परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी गाेटूल भवनाची इमारत असणे गरजेचे आहे. सिराेंचा येथे सर्व्हे क्रमांक ७१/१ मधील एक हेक्टर जमिनीवर गाेटूल भवनासाठी अतिक्रमण केले आहे. वनाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या जागेवर राेपवाटिकेसाठी खड्ड्याचे खाेदकाम सुरू करण्यात आल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शासनाने ही जागा गाेटूल भूमीसाठी द्यावी, अशी मागणी स्वायत्त परिषदेने केली आहे.
सदर वनजमिनीवर परिषदेच्या वतीने शहीद वीर बाबूराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक तयार करून सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यासाठी गाेटूल समितीची स्थापना करण्यात आली आहे. हे कार्य निरंतर ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना परिषदेचे अध्यक्ष मधुकर मडावी, उपाध्यक्ष समस्या कुळमेथे, सचिव शंकर मडावी, सहसचिव शंकर चिंतुरी आदी उपस्थित हाेते.