आरमोरी : वैशिष्ट्यपूर्ण कामाकरिता विशेष अनुदान योजनेंतर्गत आरमोरी शहराच्या विकासासाठी ७४ काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी आरमोरी येथील शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जून २०१९ मध्ये आरमोरी नगर परिषदेची स्थापना झाली. नव्याने नगर परिषद अस्तित्वात आल्याने आरमोरी शहर विकासापासून कोसो दूर आहे. आजमितीस आरमोरी शहराची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या आसपास आहे. आरमोरी नगर परिषद अंतर्गत लोकसंख्येच्या मानाने आवश्यक प्रमाणात शहराचा विकास झालेला नाही. शहराच्या विकासासाठी भरीव निधीची अत्यंत आवश्यकता आहे. आरमोरी नगर परिषदेचे आर्थिक उत्पन्न फारच कमी असल्याने शहराचा विकास करण्यासाठी शासनाकडून भरघाेस निधी द्यावा. तेव्हाच शहरातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुरांना कामे उपलब्ध होतील. आरमोरी शहराच्या विकासासाठी नगर परिषद काॅम्प्लेक्स व प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी १० कोटी रुपये, रामसागर तलावाचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १० कोटी, शहरातील भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी ३० कोटी व नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी २४ कोटी रुपये असा एकूण ७४ कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी देण्यात यावा. यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी रामसागर तलाव सौंदर्यीकरनासाठी १० कोटी निधी मंजूर करीत असल्याबाबतचे आश्वासन दिले. तसेच नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मान्यता घेऊन येण्याचा पर्यायी उपाय सांगितला.
निवेदन देताना युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष चंदू बेहरे, आरमोरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भूषण सातव, शैलेश चिटमलवार आदी उपस्थित होते.