देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५४ लाख २० हजार ५९० रुपयांचा निधी शासनाने दिला हाेता. परंतु दीक्षाभूमीवर नागपूरस्थित दीक्षाभूमी पॅटर्न स्तुप निर्माण होणे अपेक्षित आहे. ही लोकमागणी लक्षात घेऊन, तत्कालीन सरकारने याकामी एकूण १४ कोटी ७२ लाख ८६५ रुपये मंजूर केले. परंतु पुढील काही महिन्यात सरकार बदलले आणि निधी आजपर्यंत मिळाला नाही. साेमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे जिल्हा दाैऱ्यावर आले असता, दीक्षाभूमी भेटीदरम्यान महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. सोबतच माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्याशीही चर्चा केली. भेटीदरम्यान मान्यवरांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीक्षाभूमी परिसरात वृक्षारोपणही केले. दिलेल्या निवेदनावर चर्चा करताना, हा विषय समाजकल्याण विभागाशी संबंधित असल्याने समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून या समस्येवर लवकर तोडगा काढण्याचे अभिवचन पटोले आणि वडेट्टीवार यांनी दिले. निवेदन देताना सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर, उपाध्यक्षा श्यामला राऊत, सदस्या विद्या लोखंडे, यश्वदा मेश्राम, कार्यकर्त्या सविता नंदेश्वर, करुणा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते मारोती जांभुळकर, विजय मेश्राम, चंदुराव राऊत, अरविंद घुटके, शिवदास रामटेके, अमन शहारे, यश शहारे, शिरीष जांभुळकर आणि मोरध्वज शिंपोलकर उपस्थित होते.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर निधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:25 AM