नुकसान भरपाई द्या : भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे गडचिरोली : ७ ते १३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच पाळे व पऱ्ह्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बियाणे पुरवून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात भाजपच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांना निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून सतत दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवले. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करावे, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना मनोज आखाडे, मनमोहन बंडावार, जनार्धन साखरे, बापू करमे, अनिल कुनघाडकर, युवराज बोरकुट यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवा
By admin | Published: July 16, 2016 1:44 AM