कामबंद आंदोलनाचा इशारा : वैद्यकीय अधिकारी संघटनेचे निवेदनसिरोंचा : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण हरिदास बुटोलिया यांना आसरअल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पवार यांनी अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना ३ जानेवारी रोजी मंगळवारला घडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने तीव्र शब्दात निषेध करीत सदर घटनेची चौकशी करून दोषी पोलीस उपनिरिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय आकोलकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, डॉ. प्रविण बुटोलिया यांना पोलीस उपनिरिक्षक पवार यांनी मारहाण केल्यावर ते खाली पडले. डॉ. बुटोलिया यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर पुन्हा पवार यांनी शिविगाळ करून डॉ. बुटोलिया यांना मारहाण केली. डॉ. बुटोलिया हे मदतीसाठी आरडाओरड केले असता, पीएसआय पवार यांनी तुला मारले याचे सिध्द करून दाखव, असे आव्हान डॉ. बुटोलिया यांना दिले. यापूर्वी सुध्दा डॉ. बुटोलिया यांच्यावर सिरोंचा पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मारहाण झाली. मात्र तक्रार देऊनही संबंधितावर कोणतीही कारवाई झाली नाही. पीएसआय पवार यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मॅग्मो संघटनेने निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)
पीएसआयकडून डॉक्टरला मारहाण
By admin | Published: January 10, 2017 12:53 AM