अहेरीतून सुरूवात : १० दिवस तालुकास्तरावरील शासकीय कार्यालये व ग्रामीण भागात फिरणारअहेरी : रोखविरहित आर्थिक व्यवहार करण्याला चालना मिळावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सदर चित्ररथ ग्रामीण भागात फिरवून रोखविरहित आर्थिक व्यवहारांबाबत जनजागृती केली जाणार आहे. अहेरी येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे, चंद्रकांत ठाकरे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते. सदर चित्ररथ येत्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालय, बाजारपेठा, आठवडी बाजारात फिरविला जाणार आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी झालेल्या डिजिधन मेळाव्यात भिम अॅपची सुरूवात करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून केवळ आधार क्रमांक व अंगठ्याचा वापर करून आर्थिक व्यवहार शक्य होणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती कळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
चित्ररथाद्वारे रोखविरहित व्यवहारांची जनजागृती
By admin | Published: April 18, 2017 12:59 AM