महिनाभर चालणार लोकजागृती : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या विविध शासकीय योजनांची जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बुधवारी शासनाकडून वाहने दाखल झाली. या लोकजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आली. येथून त्यांनी सदर रथाला धानोरा तालुक्याच्या गावांमध्ये रवाना केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विजय मुळीक, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, संवर्ग विकास अधिकारी (रोहयो) एस. पी. पडघन, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) एम. एन. चलाख, उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे आदी उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे सुरू असलेला स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची जनजागृती या रथामार्फत गावागावात करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वशिक्षा अभियान तसेच आरोग्य अभियानाबाबतही लोकजागृती होणार आहे. अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) ची अंमलबजावणी, तेंदू, बांबू व्यवस्थापनाबाबतचे अधिकार आदी बाबतची माहिती या रथाच्या माध्यमातून तेथील कर्मचारी नागरिकांना देणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अभिनेते अमिताभ बच्चन ग्रामीण भागातील नागरिकांशी या रथाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहे व त्यांना संदेशही देणार आहेत. धानोरावरून कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व अहेरी असा १५ एप्रिलपर्यंत या रथाचा प्रवास राहिल.
वाहन रथातून होणार योजनांची जनजागृती
By admin | Published: March 16, 2017 1:18 AM