गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य सुयोग्य राखण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. काही काळ सार्वजनिक शौचालयाचा वापरही करण्यात आला. परंतु अल्पावधीतच सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने सद्यस्थितीत सार्वजनिक शौचालये दूरवस्थेत आहेत. शौचालयाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने सध्या या शौचालयांवर अवकळा आली आहे. शहरी भागात नगर परिषद व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतीने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले. गरीब नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने अभिनव उपक्रम म्हणून सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. गाव पातळीवर हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी सार्वजनिक शौचालय अनेक गावांमध्ये बांधण्यात आले. परंतु सार्वजनिक वस्तू म्हणून शौचालयांचा वापर योग्यप्रकारे करण्यात आला नाही. त्यामुळे अल्पावधीतच शौचालयांची स्थिती दयनीय झाली. ग्रामीण व शहरी भागातील बरेच नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी शौचालये उभारले खरे परंतु शौचालयातील स्वच्छता राखण्यासंदर्भात शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी असलेल्या शौचालयात पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव तर स्वच्छतेचा अभाव असल्याच्या बाबी अनेकदा उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासनाचे स्वच्छतेतून समृध्दीकडे असलेले धोरण कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या इमारती सध्या मोडकळीस आल्या आहेत. शौचालयात असलेली अस्वच्छता बघुनच अनेक नागरिक शौचालयाचा वापर करणे टाळतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत रहावे. घाण पसरू नये या उद्देशाने उभारण्यात आलेले शौचालये कुचकामी ठरत आहेत. ग्रामीण भागात तर शासनाच्या योजनेतून तयार करण्यात आलेल्या अनेक शौचालयांचा वापर नागरिक करीत नाही. या शौचालयांमध्ये गोवर्या, सरपण व अडगळीतील वस्तू भरून ठेवल्या जातात. एकूणच ग्रामीण व शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी उभारण्यात आलेले शौचालय वापराअभावी दूरवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रूपयाच्या अनुदानाचा योग्य वापर होण्यास आडकाठी येत आहे. शौचालय बांधतांना योग्य वापर होईल या विषयी चिंतन होणे आवश्यक आहे.
सार्वजनिक शौचालये दुरवस्थेत
By admin | Published: May 25, 2014 11:34 PM