भीतीचे वातावरण : प्राणीशास्त्र विभागाच्या निष्कर्षावरून स्पष्टताकुरखेडा : कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात एका बिबट्याच्या व त्याच्या बछड्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात आढळलेल्या या दोघांच्या पंज्यांच्या ठशांचे महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाकडून अवलोकन करण्यात आले. त्यानुसार हा निष्कर्ष स्पष्ट झाला आहे.गडचिरोलीच्या दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात गेल्या दोन दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रात्रीच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रांगणात दैनंदिन एक बिबट्या त्याच्या बछड्यासह दाखल होत आहे. मंगळवारी प्रांगणात या दोघांच्या पंज्यांचे ठसे निदर्शनास आले. लगेच प्राणीशास्त्र विभागाच्या चमूने या ठशांचे अवलोकन केले. प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तेव्हा ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे कुरखेडात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ऐन महाविद्यालयाच्या परिसरात बिबट्याचे ये-जा सुरू असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही धोका होण्यापूर्वी वनविभागाने याबाबत खबरदारी घ्यावी, असा सूर उमटत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेड्याच्या मुनघाटे महाविद्यालयात आढळले बिबट्याच्या पंजाचे ठसे
By admin | Published: September 28, 2016 2:27 AM