गडगडा गावानजीकची घटना : धोका होण्याची शक्यताकुरखेडा : शनिवारच्या रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत कुरखेडा तालुक्यात संततधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील गडगडा गावानजीकच्या नदीवरील पुलाच्या खालच्या भागाचा पिल्लर वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरून रहदारी करणे धोकादायक झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. धानपिकासह इतर पिकांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. गडगडा गावानजीकच्या नदीवरील पूल दीड वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मात्र अतिवृष्टीने सदर पुलाचा पिल्लर अल्पावधीत खचला. पूल खचल्याची बाब शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना त्यांनी केलेल्या दौऱ्यादरम्यान दिसून आली. गडगडा गावानजीकच्या नदीच्या पुलावरून मोठे वाहन गेल्यास पूल वाहून जाऊ शकतो. त्यामुळे महाड येथील सावित्रीबाई पूल वाहून जाऊन फार मोठी हानी होऊ शकते, अशी शक्यता सुरेंद्रसिंह चंदेल यांनी व्यक्त केली आहे. सदर पुलाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी चंदेल यांनी केली आहे. दौऱ्याच्यावेळी कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, अविनाश गेडाम, प्रशांत किलनाके, मोन्टू चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पावसाने पुलाचा पिल्लर वाहून गेला
By admin | Published: September 14, 2016 1:43 AM