गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेले देसाईगंज शहर लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांचा ओघ जास्त आहे. अशात कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या नागपूर येथून दररोज किराणा, भाजीपाला व इतरही वस्तूंची आयात हाेत आहे. परंतु याच स्थितीत कोविड-१९ च्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. देसाईगंज तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
जमावबंदी आदेश असतानाही देसाईगंज शहरासह तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे नागरिकांसाठी ही स्थिती धाेकादायक ठरत हाेती. ही गंभीर समस्या ओळखून लाेकमतने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने १ एप्रिल रोजी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या नेतृत्वात कोविड-१९ च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत विनामास्क आढळून आलेल्या व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनावश्यक गर्दी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रतिष्ठाने, माॅल्सवर धडक दंडात्मक वसुलीची कारवाई करीत एकाच दिवशी तब्बल २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या वेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष महले, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी एस.एस. सलाम, पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल, मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नारायण मिसार, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी उचित काळजी घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माेहिमेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
बाॅक्स
बाहेरील व्यापारी धाेकादायक
देसाईगंज येथे बाहेरच्या जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात व्यापारी येतात. हे व्यापारी काेराेना विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून देसाईगंज येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव करावा, अशी मागणीही आता जाेर धरत आहे. तसेच विविध सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना कराव्या, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.