देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. मुख्याध्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्या मार्गदर्शनात त्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
ही पथके शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांना गाठून त्यांना तिथेच दंड ठोठावतील. दरम्यान या पथकाने गुरूवारी कारवाईला सुरूवात करताच विनामास्क फिरणाऱ्या अनेकांनी लांबूनच पळ काढणे सुरू केले. मास्क न वापरणाऱ्यावर २०० रुपये दंड आकारला जात आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये, दुकानांमधे ६ फुटाच्या आत जास्त व्यक्ती आढळल्यास १००० रुपये आणि त्याच व्यक्ती पुन्हा आढळल्यास २००० रुपये असा दंड आकारला जाणार आहे.
नगर परिषदेच्या दोन पथकांपैकी पहिल्या पथकात कार्यालय अधीक्षक महेश गेडाम, विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, कर्मचारी हमीद पठाण, सफाई कर्मचारी शैलेश खांडेकर, मुकेश सोणेकर, शिक्षक शिवराम हेडाउ, वाल्मिक कापगते, मुद्फीद पठाण, सागर बनपूरकर, विलास बोदरे तर दुसऱ्या पथकात सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, स्वछता अभियंता आशिष गेडाम, फायरमन सुनील नाकाडे, स्थापत्य अभियंता साई कोंडलेकर, मंगेश नाकाडे, शिक्षक मोहन गहाणे, अनंतराम कापगते, ईश्वर गहाणे, आशिष राघोर्ते आदींचा समावेश आहे. दरम्यान या कारवाईमुळे मास्क घालून फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.