कोरची - कोरची शहरात दोन दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर तहसील कार्यालयामार्फत चार हजार पाचशे रुपये दंड, तर नगरपंचायत कार्यालयाकडून दोन हजार सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला. पुन्हा कोरचीत ताळेबंदीची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन करीत नियम ताेडणाऱ्या लाेकांवर कडक दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा तहसीलदार सी. आर. भंडारी यांनी दिला.
तहसीलदारांनी कोरचीत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी नायब तहसीलदार बी. एन. नारनवरे, नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब हाक्के, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ आदी हजर हाेते. कोरोना विषाणूंचा इतर जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दिलेल्या आदेशानुसार, २६ फेब्रुवारी २०२१ ला तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी तहसील कार्यालयात कोरचीतील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, कोरची तालुका व नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व गावकरी व व्यापारी वर्ग तसेच बाहेर गावावरून शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना काेराेनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.
कोरची तालुका आदिवासीबहुल तालुका असून, येथील नागरिक बहुतांश गरीब आहेत. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड खूप जास्त होईल. तो कमी करून शंभर रुपये करावा तसेच नगरपंचायतीकडून शहरातून वारंवार फेरी काढून माहिती देऊन नागरिकांना सतर्क राहण्यास सांगावे. तसेच पूर्वीप्रमाणे प्रत्येक दुकानासमोर सुरक्षित अंतर ठेवून चुन्याने आखणी करून ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कोरचीतील व्यापाऱ्यांमध्ये नितीन रहेजा, प्रकाश कावळे, चेतन मेश्राम, मधुकर नखाते, नंदकिशोर वैरागडे, राहुल अंबादे आदी उपस्थित होते.