लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीच्या आधी आणि नंतरही परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने ऐन दिवाळीत शेतकºयांच्या घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झालेच नाही. पावसात सापडलेल्या धानाची मळणीच झाली नसल्यामुळे धान विकून दिवाळी साजरी करण्याच्या शेतकºयांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्या गेले. या परिस्थितीमुळेच अद्याप जिल्ह्यात एकही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही.वर्षातील सर्वात मोठा सण असणाºया दिवाळीच्या निमित्ताने शेतकरी वर्ग मुलाबाळांना नवीन कपड्यांच्या खरेदीसह घरात लागणाºया वस्तूंचीही खरेदी करतात. पण धानच विकल्या गेला नसल्याने शेतकºयांच्या हाती पैसा आला नाही. धान कापणीवर असताना आणि काहींनी मळणीसाठी कापून ठेवला असताना पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे धानाची मळणीच होऊ शकली नाही. जिल्हा प्रशासनाने दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून धान खरेदी करण्याची परवानगी ८८ केंद्रांना दिली. पण प्रत्यक्षात केंद्रांवर धान येणे शक्य नसल्यामुळे महामंडळाने खरेदी केंद्र सुरूच केले नाही.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयांतर्गत ४४ केंद्रांना तर अहेरी कार्यालयांतर्गत ३३ केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनमार्फत ११ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. मात्र मंगळवार २४ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. परतीच्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता येत्या १५ नोव्हेंबरपूर्वी धान खरेदीला जोर येणार नसल्याचे अहेरीचे प्रादेशिक व्यवस्थापक मुळेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून जे.पी. राजूरकर यांनी मंगळवारी प्रभार घेतला. कार्यक्षेत्रातील सर्व ४४ केंद्र लवकरात लवकर सुरू करून शासकीय हमीभावाने धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कनिष्ठ अधिकाºयांना दिले. यावर्षी ए ग्रेडच्या धानाला १५९० तर साधारण ग्रेडच्या धानाला १५५० रुपये हमीभाव दिला जाणार आहे.कोरची तालुक्यात कोरची, मसेली, बेतकाठी, मरकेकसा, बेडगाव, कोटरा, कुरखेडा तालुक्यात रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, यंगलखेडा, कुरखेडा, आंधळी, कढोली, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, देऊळगाव, गोठणगाव, सोनसरी, अंगारा, उराडी, आरमोरी तालुक्यात देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, देसाईगंज तालुक्यात पिंपळगांव, विहीरगाव, गडचिरोली तालुक्यात मौशीखांब, धानोरा तालुक्यातील रांगी, मुरुमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, पेंढरी, मोहली तसेच चामोर्शी तालुक्यातील घोट, मक्केपल्ली, रेगडी, आमगाव, अडयाळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव या केंद्रांवर धान खरेदी होईल.याशिवाय अहेरी तालुक्यातील अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगूर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, मुलचेरा तालुक्यातील लगाम, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली, भामरागड तालुक्यातील भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, कसनसूर, जारावंडी, गेंदा, कोठमी, हालेवारा या केंद्रांचा समावेश आहे.
परतीच्या पावसाचा धान खरेदीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:53 AM
दिवाळीच्या आधी आणि नंतरही परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने ऐन दिवाळीत शेतकºयांच्या घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झालेच नाही.
ठळक मुद्देमळणीला विलंब : एकही खरेदी केंद्र सुरू नाही