दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील ८९ केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र २०१६-१७ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल २ लाख १३ हजार ४०९ क्विंटलने धान खरेदी घटली आहे.पावसाचा अनियमितपणा व धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आले. याचा परिणाम महामंडळाच्या धान खरेदीवर झाला. २०१६-१७ च्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालय मिळून महामंडळातर्फे जिल्ह्यात ८८ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांवरून एकूण १ अब्ज ५ कोटी ८५ लाख ३ हजार ७०८ रूपये किमतीच्या एकूण ७ लाख २० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५ लाख ५ हजार ६१९ तर अहेरी कार्यालयांतर्गत २ लाख १४ हजार ४५१ क्विंटल धान खरेदी झाली होती. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या २०१७-१८ च्या खरीप हंगामात ८९ केंद्रांवरून ७८ कोटी ५३ लाख २५ हजार ३५६ रूपये किमतीच्या एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ लाख ६८ हजार ६३५ क्विंटल तर अहेरी कार्यालयांतर्गत १ लाख ३८ हजार २६ क्विंटलची धान खरेदी झाली आहे.
३ कोटी १५ लाखांचे चुकारे प्रलंबितआदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना थेट आॅनलाईन स्वरूपात चुकाऱ्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात अदा केली जाते. मात्र या प्रक्रियेत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. २०१७-१८ चा खरीप हंगाम संपूनही धान विक्री केलेल्या जिल्हाभरातील ९७८ शेतकऱ्यांचे ३ कोटी १५ लाख ८२ हजार ११८ कोटी रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.