जल शुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन : दररोज १० लाख लिटर पाणी होणार शुध्द भामरागड : अॅटलास कापको (भारत) लिमिटेड या इटलीतील कंपनीद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १० लाख लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र पूर्णत्वास आणण्यात आले आहे. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात येणारे रूग्ण, नातेवाईक तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना आता पिण्याचे शुध्दी पाणी मिळणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन १५ मार्च रोजी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे व अॅटलास कापकोचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालिनी शर्मा, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, पाटील, डॉ. अनघा आमटे, डॉ. दिगंत आमटे, समिक्षा आमटे व अनिकेत आमटे आदी मान्यवर उपस्थित होते. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात दररोज हजारो पर्यटक भेट देतात. प्रकल्पाच्या आश्रमशाळेत ६५० ते ७०० विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. प्रकल्पातील दवाखान्यात येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रकल्पाचे कार्यकर्ते व कर्मचारी निवासी राहतात. या सर्वांना आता शुध्द पेयजल मिळणार आहे. वर्षभरापूर्वी अॅटलास कापको या कंपनीने पामुलगौतम नदीपासून लोकबिरादरी प्रकल्पापर्यंत तीन किमी अंतरावर पाईपलाईन टाकली. त्यानंतर प्रकल्पात जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती केली. बरेच आजार हे अशुध्द पाण्यातूनच होतात. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती करण्याचा निर्णय लोकबिरादरी प्रकल्पाने घेतला. मात्र यासाठी तांत्रिक मदत हवी होती. शर्थीचे प्रयत्न करून अॅटलास कापको कंपनीने लोकबिरादरी प्रकल्पात जलशुध्दीकरण केंद्र पूर्णत्वास आणले आहे. त्यामुळे आता सर्वांना शुध्द पेयजल मिळेल, असे मनोगत डॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जमीर शेख यांनी केले तर आभार जितेंद्र नाईक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
लोकबिरादरी प्रकल्पात शुध्द पेयजलाची सुविधा
By admin | Published: March 19, 2017 2:00 AM